साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धा २०२५ २८ मार्चला पुरस्कार वितरण सोहळा
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक, माजी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदा दुसऱ्या वर्षीही मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक येथील १५० हून अधिक लेखकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक केली.
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये डॉ. क्षमा संजय शेलार यांच्या ‘धुकं’ या कथेला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना रु. १५,०००/- आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक प्रभाकर महादलिंग मठपती यांच्या ‘शेकडा पाच’ या कथेला, तर तृतीय क्रमांक विनय दिलीप खंडागळे यांच्या ‘टिचल्या बांगड्यांचं घर’ या कथेला मिळाला आहे. तसेच योगिनी श्रीनिवास पाळंदे (‘नवीन नाते’), प्रसाद अनंत खानोलकर (‘दुतोंडी अजगर’), डॉ. मोनाली हर्षे (‘अट्टाहास’) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विनोदी कथेत प्राजक्ता प्रशांत आपटे यांच्या ‘नाटक’ या कथेला विशेष गौरव मिळाला आहे.
या स्पर्धेसाठी नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर विजय नाडकर्णी यांनी प्राथमिक छाननी केली. स्पर्धेचे समन्वयन ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, इतिहासाचे अभ्यासक, लेखक व प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील हे ‘शिवचरित्र’ या विषयावर विशेष व्याख्यान सादर करणार आहेत. साहित्य, इतिहास आणि विचारप्रबोधनाचा संगम साधणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

Comments