राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यदिन स्वागत समारंभ ('ॲट होम') 15 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती भवन हे केवळ भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालयच नाही, तर देशाचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठही आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य-स्तरीय स्वागत समारंभ, परदेशी मान्यवरांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवान्या, 'आर्टिस्ट-इन-रेसिडेन्स' (निवासी कलाकार) कार्यक्रम आणि 'राजा पर्व' यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपती भवन देशातील विविध कला-परंपरांना एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देते. अशा उपक्रमांचा उद्देश, केवळ राष्ट्रपती भवनात विविध कलाप्रकार सादर करणे हाच नाही, तर त्यांना एका सामायिक राष्ट्रीय सांस्कृतिक अस्मितेचा भाग म्हणून एकत्र आणणे हा देखील आहे.
संकल्पना
भारताच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यदिनानिमित्त समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि पर्यावरण संवर्धनाची चिरंतन परंपरा यांचा उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची यंदाची संकल्पना महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील शाश्वत पर्यावरणीय पद्धती आणि जिवंत कला परंपरांवर प्रकाश टाकते, तसेच समुदाय, संस्कृती आणि निसर्ग यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे दर्शन घडवते.
या निमित्ताने आयोजित निमंत्रण पत्रिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश यांच्या पर्यावरणीय संपदेकडे लक्ष वेधतात. पारंपरिक कलाप्रकार आणि सादरीकरणांच्या माध्यमातून, स्थानिक समुदायांनी पिढ्यानपिढ्या निसर्गाचे जतन आणि संवर्धन कसे केले आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला जात आहे. सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धन परस्परांना पूरक आहेत, याचे प्रतिबिंब या संकल्पनेतून उमटते.
लोकनृत्य सादरीकरण
· समारंभादरम्यान चार राज्यांमधील सुमारे 35 कलाकार लोकनृत्य आणि पारंपरिक संगीत सादर करतील.
· कार्यक्रमात लावणी, तुतारी, सोंगी मुखावटे, गेडी नृत्य, गौर माडिया, भगोरिया, बैगा कर्मा, समई आणि घोडे मोडेनी यांचा समावेश आहे.
· या सादरीकरणांमुळे मान्यवर आणि निमंत्रित व्यक्तींना महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांशी संबंधित जिवंत परंपरा, कथा, वाद्य, वेशभूषा आणि सामुदायिक प्रथा अनुभवण्याची संधी मिळेल.
महाराष्ट्र - लावणी ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय लोककला प्रकारांपैकी एक असून, यात संगीत, काव्य, नृत्य आणि नाट्य यांचा संगम आहे, तसेच यामधून शौर्य, भक्ती आणि मानवी भावनांचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील 'सोंगी मुखवटे' हा आदिवासी समुदायांकडून चैत्र महिन्यातील उत्सवांदरम्यान सादर केला जाणारा एक वैशिष्ट्यपूर्ण मुखवटा-नृत्य प्रकार आहे. हा नृत्यप्रकार सकारात्मक शक्तींचा विजय आणि समुदायाचे कल्याण याचे प्रतीक मानला जातो.
छत्तीसगड - छत्तीसगडमधील 'गेडी' नृत्य, हे 'हरेली' उत्सवादरम्यान उंच बांबूच्या खांबांवर उभे राहून केले जाते. या दमदार नृत्यातून विलक्षण समतोल, चपळता आणि कौशल्य दिसून येते. तसेच, छत्तीसगडमधील 'गौर मडिया' नृत्य हे बस्तरमधील 'मडिया' जमातीशी संबंधित आहे. या नृत्यात म्हशीची शिंगे आणि मोरपिसांनी सुशोभित केलेले पारंपरिक शिरोभूषण धारण केले जाते. यामधून या समुदायाची शिकारीची परंपरा आणि आदिवासींचे शौर्य प्रतिबिंबित होते.
मध्य प्रदेश - भगोरिया नृत्य हे होळीपूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या भगोरिया जत्रेशी जोडलेले भिल आदिवासी समुदायाचे चैतन्यमय नृत्य आहे, जे मध्य प्रदेशच्या सामाजिक आणि कृषी परंपरांचे दर्शन घडवते. मध्य प्रदेशातील बैगा जमातीचे 'कर्मा' नृत्य हे निसर्ग, समृद्धी आणि सुगीच्या हंगामाचा उत्सव साजरा करते. हे नृत्य बैगा समुदायाच्या सांस्कृतिक अस्मितेची अभिव्यक्ती आहे.
गोवा – गोव्याचे समई नृत्य हे आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. यात कलाकार आपल्या माथ्यावर पारंपरिक पितळी समईचा तोल साधत लोकसंगीतावर नृत्य सादर करतात. याचप्रमाणे गोव्याचा घोडे मोडनी हा गोव्यातील योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण करून देणारा युद्धकलेवर आधारित लोकनृत्यप्रकार आहे. या नृत्यात कलाकार घोड्यांच्या प्रतिकृती धारण करून, तलवारी हातात घेऊन ढोलाच्या तालावर नृत्य सादर करतात.
सांगीतिक सादरीकरण
यंदाच्या स्वातंत्र्यदिन स्वागत समारंभातील सांगीतिक सादरीकरणाची रचना अखंड सांस्कृतिक कथानकाच्या स्वरूपात करण्यात आली आहे. हे कथानक जंगले, गावे, मंदिरे, किनारपट्टी यांचा प्रवास घडवत भारताच्या चैतन्यमयी लोककला परंपरेचे दर्शन घडवेल.
भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याबरोबरच शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब या सादरीकरणातून उमटते.
या सांगीतिक सादरीकरणाचा प्रारंभ बस्तर आणि छत्तीसगडच्या मंगलमय समारंभ परंपरांसाठीच्या पवित्र 'मंगल धून'ने होईल. त्यानंतर हा प्रवास महाराष्ट्राच्या लोकपरंपरा, गोव्याच्या किनारपट्टीवरील परंपरा आणि मध्य प्रदेशाच्या आदिवासी सांगीतिक वारशातून पुढे पुढे जात राहील. अंतिम टप्प्यात या चारही राज्यांतील कलाकार एकत्र येत सामायिक सांगीतिक संवाद साकारतील.
यंदाच्या सांगीतिक संचाचे संकलन आणि संयोजन छत्तीसगडचे प्रख्यात लोकगायक, संगीतकार, लेखक आणि रंगकर्मी राकेश कुमार तिवारी यांचे आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित राकेश कुमार तिवारी हे छत्तीसगढी लोकसंगीताच्या जतन आणि संवर्धनातील योगदानासाठी ओळखले जातात.
सहभागी कलाकार
छत्तीसगडमधल्या बालोद येथील मोहरी, दफडा, डमऊ, गुडुम आणि बासरी यांसारख्या पारंपरिक वाद्यांवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे एक कलाकार. तसेच नारायणपूर येथील गुटा पराई, नार पराई, ढोल आणि कुंडीर यांसारख्या वाद्यांच्या माध्यमातून बस्तरचा समृद्ध लोकवारसा सादर करणारे एक कलाकार कार्यक्रमात सहभागी होतील.
मध्य प्रदेशातून - गुडुम, मांदर, सिंगबाजा आणि डफला या वाद्यांचे कुशल वादक; तसेच आणखी एक कलाकार जे टिमकी, झांज आणि डफला यांसारख्या पारंपरिक वाद्यांद्वारे आपल्या कुटुंबाचा संगीत वारसा पुढे चालवत आहेत, ते या कार्यक्रमात सहभागी होतील.
महाराष्ट्रातून - गोंधळ आणि जागरण परंपरांमध्ये 25 वर्षांहून अधिक अनुभव असलेले लोकसंगीतकार व गायक; तसेच गोंधळ, जागरण आणि वाघ्या-मुरळी परंपरांशी जोडलेले एक प्रख्यात लोक-तालवाद्य वादक या कार्यक्रमात राज्याचा भक्ती आणि सांस्कृतिक वारसा सादर करतील.
गोवा – गोमंतकीय पारंपरिक संगीताची वैशिष्ट्यपूर्ण वाद्ये असलेल्या घुमट, शामेळ आणि कासाळे वादनात प्रावीण्य असलेले नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांच्या सादरीकरणातून गोव्याच्या समृद्ध भक्तिपर आणि लोकसंगीत परंपरांचे दर्शन घडेल.
सजावट आणि खाद्यसंस्कृती
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक अभिव्यक्ती केवळ संगीत आणि नृत्यापुरती मर्यादित राहणार नसून हस्तकला, वस्त्रपरंपरा, पाककला आणि सजावट यांच्या माध्यमातूनही ती साकारली जाणार आहे. त्यामुळे पाहुण्यांना भारताच्या विविधतेचा अधिक व्यापक आणि समग्र अनुभव घेता येईल.
भोजन मेजावरील प्रावरणातून या राज्यांशी संबंधित पारंपरिक हस्तकला आणि वस्त्रपरंपरांचे दर्शन घडवण्यात येईल. यामध्ये मध्य प्रदेशातील बाग गावातील कापडावरील हस्तछपाई कला बाग प्रिंट, महाराष्ट्रातील खण, गोव्यातील कुणबी वस्त्रपरंपरा आणि छत्तीसगडच्या सौरा परंपरेचा समावेश आहे.
खाद्यपदार्थही सांस्कृतिक कथनाचे माध्यम ठरणार आहेत. प्रस्तावित बेतामध्ये मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंदोरी पोहे, पातोळे, मिनी फर्रा, वडा पाव, बफौरी, खमंग काकडी, ठेठरी, डोडोल आणि कोदो मिलेटची खीर यांचा समावेश आहे.
पाहुण्यांना छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव केवळ संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनच नव्हे, तर हस्तकला, वस्त्रपरंपरा आणि खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातूनही घेता येणार आहे
Comments