कॅनडात रंगला मराठी खाद्यप्रेमींचा 'रुचिकला महोत्सव'; टोरोंटो परिसरातील मराठी संस्कृतीचा अनोखा संगम

कॅनडा (मिसीसागा) : कॅनडातील मिसीसागा येथील फ्रॅंक मॅकेनझी कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'रुचिकला महोत्सव २०२६' ला मराठी खाद्यप्रेमी आणि रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा, परंपरेचा आणि कलावैभवाचा अनोखा अनुभव घेतला. सुमारे ३०० ते ३५० मराठी नागरिकांच्या उपस्थितीने हा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला.

मराठी परंपरा सांस्कृतिक संघटनेच्या वतीने २०२२ पासून सुरू असलेल्या मराठी संस्कृती जतनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या महोत्सवाचे आयोजन राजसी कटारे यांनी केले. टोरोंटो परिसरातील मराठी बांधवांना एकत्र आणणे, त्यांच्या कला, व्यवसाय आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे तसेच नव्या पिढीला मराठी परंपरेची ओळख करून देणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अत्यंत शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने करण्यात आली. उपस्थितांनी राजसी कटारे यांच्या उत्कृष्ट आयोजनाचे मनापासून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.


या महोत्सवाच्या यशात चिन्मय कुलकर्णी, सुधीर प्रधान, ओंकार म्हात्रे, मनाली संत आणि अजय सुटकणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


महोत्सवातील खाद्यपदार्थ विभाग विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. उकडीचे मोदक, वडापाव, पाणीपुरी, पावभाजी यांसारख्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांसह विविध मसाले, पारंपरिक दागिने आणि हस्तकला वस्तूंचे स्टॉल नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरले. महाराष्ट्राच्या चवीचा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळाली.


यावेळी राजसी कटारे म्हणाल्या की , "परदेशात राहूनही मराठी संस्कृती, परंपरा आणि खाद्यवैभव जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. टोरोंटो परिसरातील मराठी भाषिकांनी एकत्र यावे, त्यांच्यात स्नेहबंध दृढ व्हावेत आणि त्यांच्या कला, व्यवसाय व संस्कृतीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने 'रुचिकला महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा उत्सव आहे."मराठी परंपरा जपूया... संस्कृतीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया!" असे आवाहन त्यांनी केले.


मराठी संस्कृती जपण्याचा संदेश


"मराठी परंपरा, संस्कृती आणि संस्कार जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या सण-उत्सवांमधून, पारंपरिक खेळ, लोककला, खाद्यसंस्कृती आणि मराठी भाषेच्या जतनातून आपण आपल्या समृद्ध वारशाला पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो, नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते आणि मराठी संस्कृतीचा अभिमान अधिक दृढ होतो."असा विश्वास कटारे यांनी व्यक्त केला.


स्वादिष्ट खाद्यपदार्थ, उत्कृष्ट नियोजन, सांस्कृतिक जिव्हाळा आणि मराठी माणसांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 'रुचिकला महोत्सव २०२६' हा टोरोंटो परिसरातील मराठी समाजासाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra