मुंबईकरांच्या प्रेमामुळे महालक्ष्मी सरस २०२६ ला आणखी तीन दिवस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबईकरांच्या आग्रहास्तव महालक्ष्मी सरस २०२६ आता १७ मेपर्यंत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर प्रदर्शन आणखी तीन दिवस सुरू राहणार

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; जयकुमार गोरे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता*

मुंबई :*  बीकेसी येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक मुंबईकरांकडून प्रदर्शनाची तारीख वाढवण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. प्रदर्शनातील महिला बचत गटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, दररोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा आग्रह लक्षात घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष प्रस्ताव मांडला.


प्रदर्शनाला मिळणारा उदंड प्रतिसाद, महिलांच्या उत्पादनांची वाढती विक्री आणि नागरिकांचा वाढता उत्साह पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रदर्शनाची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला. त्यानंतर महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शन आता १७ मेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रदर्शन २ मे ते १४ मेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. मात्र आता नागरिकांना आणखी तीन दिवस महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे.


ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आयोजित या प्रदर्शनामुळे हजारो महिलांना मोठी संधी मिळत आहे. महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने आणि विविध नाविन्यपूर्ण वस्तूंना मुंबईकरांकडून मोठी पसंती मिळत आहे.


२ मेपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल २१ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, ९ मे २०२६ रोजी एका दिवसातच जवळपास ६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवण्यात आला. त्यामुळे महिला बचत गटांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


सध्या सुरू असलेला सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता अनेक नागरिकांना प्रदर्शनाला भेट देता आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रदर्शन आणखी काही दिवस सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. हा जनतेचा आग्रह आणि प्रदर्शनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि त्याला तत्काळ मान्यताही मिळाली.


यासोबतच प्रदर्शनासाठी मोफत प्रवेशासोबत विशेष मोफत बससेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला भेट देत असून महिलांच्या उत्पादनांना भरघोस प्रतिसाद देत आहेत.

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra