वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली-सुभाष देसाई
मुंबई- साहित्यसेवक वसंत तावडे हे एक अजब रसायन होते.त्यांचा प्रत्येक कामात आग्रह,शिस्त, चौकट होती.मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता.त्यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली.मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता.प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता अश्या शब्दात शिवसेनेचे नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी काल रात्री गोरेगावात वसंत तावडे यांच्या कार्याचा गौरव केला. सुभाष देसाई पुढे म्हणाले की, आज वाचन आणि लेखनाचा संबंध तुटला तो या स्पर्धेने खोटा ठरवला.
प्रबोधन गोरेगावने साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन मार्मिक कथास्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुभाष देसाई बोलत होते.यावेळी मंचकावर जेष्ठ पत्रकार संजीव साबडे ,मार्मिकचे संपादक मुकेश माचकर,शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर,विनोदी लेखक सॅबी परेरा,प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे,सल्लागार प्रा. बापू नाडकर्णी,संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, कोषाध्यक्ष रमेश इस्वलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
इतिहासाचे अभ्यासक, लेखक व प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी सुमारे दीड तास ‘शिवचरित्र’ या विषयावर विशेष व्याख्यान सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडला.
प्रबोधन गोरेगाव आणि मार्मिकच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.लेखकांच्या कथा मार्मिक मध्ये प्रसिद्ध झाल्या.वाचक आपल्या कथा वाचतात याचा लेखकाला मनापासून आनंद झाला असे त्यांनी नमूद केले.प्रबोधन गोरेगाव ही संस्था एखादे काम हाती घेते ते पुढे सुरूच राहते.या संस्थेची यशस्वी शतकी वाटचाल होईल आणि तरुणांनी संस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी पुढे यावे असे त्यांनी आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी प्रबोधन गोरेगाव आणि वसंत तावडे यांच्या आठवणी जागावल्या.प्रबोधन गोरेगाव या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून ही संस्था आज कला, सेवा आणि क्रीडा या क्षेत्रात ५४ वर्षे डोलाने उभी आहे. आपण वाचत नाही, आजची पिढी पुस्तक,पुस्तक- दिवाळी अंक विकत घेत नाही,लायब्ररीचे सदस्य होत नाही. मोबाईल वर आपण अधिक वेळ रील बघण्यात घालवतात यावर त्यांनी उहापोह केला. ही स्थिती बदलण्यासाठी प्रबोधन गोरेगावने साहित्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी तरुणांना एकत्रित करून पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार मुकेश माचकर म्हणाले की,सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदा दुसऱ्या वर्षीही मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक येथील १५० हून अधिक लेखकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक केली.या स्पर्धेला मिळालेला चांगला प्रतिसाद बघता मराठी भाषा लयाला गेली नाही हे सिद्ध झाले.प्रबोधन गोरेगाव आणि मार्मिक यांनी पुढच्या वर्षी कथारुपी दिवाळी अंक प्रसिद्ध करून या स्पर्धेतील कथा त्यात प्रसिद्ध कराव्यात असे त्यांनी आवाहन केले.
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांमध्ये डॉ. क्षमा संजय शेलार यांच्या ‘धुकं’ या कथेला प्रथम क्रमांक म्हणून रु. १५,०००/- आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक प्रभाकर महादलिंग मठपती यांच्या ‘शेकडा पाच’ या कथेला, तर तृतीय क्रमांक विनय दिलीप खंडागळे यांच्या ‘टिचल्या बांगड्यांचं घर’ या कथेला देण्यात आला.तसेच योगिनी श्रीनिवास पाळंदे (‘नवीन नाते’), प्रसाद अनंत खानोलकर (‘दुतोंडी अजगर’), डॉ. मोनाली हर्षे (‘अट्टाहास’) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विनोदी कथेत प्राजक्ता प्रशांत आपटे यांच्या ‘नाटक’ या कथेला विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेसाठी प्रबोधन गोरेगावचे कार्यवाह गोविंद गावडे आणि सल्लागार सदस्य विजय नाडकर्णी यांनी सुरुवातीपासून सदर कथा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.यावेळी विनोदी लेखक सॅबी परेरा यांनी या स्पर्धेतील कथांविषयी त्यांचे विचार मांडले.प्रास्ताविक विजय नाडकर्णी यांनी केले,तर सूत्रसंचालन संगीता थोरात यांनी केले.यावेळी तावडे कुटुंब आणि गोरेगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments