वर्सोव्यात ईस्ट इंडियन संगीत स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई-वर्सोवा,यारी रोड येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या मैदानात ईस्ट इंडियन संगीत स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत वर्सोवा,पार्ले,जुहू,वांद्रे,कलिना,मनोरी,खारोडी,उत्तन, पाली,डोंगरी,विक्रोळी येथील सुमारे ३० स्पर्धकांनी भाग घेतला.यावेळी आपल्या मधुर आवाजाने ईस्ट इंडियन मराठी बोली भाषेत कुटुंबासह आलेल्या सुमारे २००० ईस्ट इंडियन ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष करत या संगीत स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करून त्यांना परितोषिके देण्यात आली.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून टांझानियाचे दक्षिण भारतातील चेन्नई येथील वाणिज्य दूत व प्रसिद्ध उद्योगपती कृष्णराव पिंपळे उपस्थित होते.यावेळी पिंपळे म्हणाले की,येथील ईस्ट इंडियन सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा जल्लोष नाही तर परंपरेचे संस्कृतीचे आणि माणुसकीचे जतन करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. गाण्याच्या माध्यमातून मन शांत होते, विचार उजळतात आणि समाज जोडला जातो.कला ही देवाची देणगी आहे तिला जपा, वाढवा आणि समाजासाठी वापरा.संस्कृती जपली तरच समाज टिकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन कॅथलिक वेलफेयर असोसिएशन ऑफ वर्सोवा गांवचे अध्यक्ष रसल घोन्सलवीस, चीफ कॉर्डिंटर जॉन बुथेलो यांनी केले होते.ईस्ट इंडियन बांधवांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१२ पासून नोव्हेंबर मध्ये या संगीत स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात अशी माहिती बुथेलो यांनी दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वर्सोव्याचे शिवसेनेचे आमदार हारून खान, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे,माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे, मिखाईल मॅकनेस,भंडारी समाजाचे नेते मनोज मासेलकर, फादर जोसेफ घोन्सालवीस,फादर विजय ड्रेगो, कॅप्टन राकेश कोयलो , रोलन मिरांडा, नोएल डिसोझा आणि सिस्टर बतीला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments