मुंबई -उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला, ज्यावेळी वळणई – मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी” असे करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते काल सकाळी या नव्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
या समारंभात बोलताना पीयूष गोयल यांनी अथर्व युनिव्हर्सिटीचे संस्थापक व कुलपती सुनील राणे यांचे अभिनंदन करत सांगितले की, “मी अथर्व ग्रुपचे अभिनंदन करतो. यंदा संस्थेला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी हे मेट्रो स्थानक दत्तक घेतले आहे. यामुळे लाखो प्रवाशांना संस्थेची ओळख होईल आणि तरुणाईला शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल,” असा आशावाद व्यक्त केला.
“अथर्व युनिव्हर्सिटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी सुविधा उपलब्ध आहे. कौशल्य विकासासाठी ही संस्था मोलाचे कार्य करते. त्यामुळे उत्तर मुंबईची ओळख आता ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’ या नावाने होईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानकाचे अनावरण आणि मान्यवरांची उपस्थिती
या नामकरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर अथर्व युनिव्हर्सिटीचे कुलपती सुनील राणे, उपाध्यक्षा वर्षा राणे, साईन पोस्ट इंडियाचे श्रीपाद अष्टेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
२५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास आणि नवे पर्व
यावेळी अथर्व युनिव्हर्सिटीचे कुलपती सुनील राणे यांनी १९९९ साली संस्थेची स्थापना झाल्यापासूनचा २५ वर्षांचा प्रवास उलगडला. विद्यादानाचे पवित्र कार्य आमच्या संस्थेने सातत्याने केले आहे. आज विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्व घटकांना सक्षम करण्यासाठी अथर्व कार्यरत आहे. हे स्थानक केवळ नावापुरते नव्हे, तर आमच्या मूल्यांचे व समाजाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या व “गौरवशाली भारत” निर्माण व्हावा, असा संदेश उपस्थितांना दिला.
अधिसूचना आणि औपचारिक मान्यता
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि,३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार अथर्व शैक्षणिक संस्थेला ‘अथर्व युनिव्हर्सिटी’ म्हणून औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. या युनिव्हर्सिटीच्या परिसरालगत असलेल्या वळणई – मीठ चौकी मेट्रो स्थानकाला नवे नाव देणे ही संस्था आणि शहरासाठी एक अभिमानाची बाब ठरली आहे.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक, प्राध्यापकवर्ग व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment