बॉम्बे वायएमसीए’चे कार्य धर्मनिरपेक्ष!
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून संस्थेच्या दीडशे वर्षांच्या वाटचालीचा गौरव
मुंबई : ‘बॉम्बे वायएमसीए’च्या (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) नावात जरी ख्रिश्चन धर्माचा समावेश असला तरी दीडशे वर्षांची यशस्वी वाटचाल असलेल्या संस्थेचे कार्य हे धर्मनिरपेक्ष म्हणजेच सर्वांसाठी राहिलेले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘बॉम्बे वायएमसीए’च्या कार्याचा गौरव केला.
मुंबईतील जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए येथे शुक्रवारी झालेल्या ‘बॉम्बे वायएमसीए’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. ‘‘ब्रिटिशकाळात ‘बॉम्बे वायएमसीए’ची स्थापना झाली. पण आजही त्यांचे समाजासाठीचे कार्य अखंड सुरू आहे. याचे श्रेय त्यांच्या स्वयंसेवकांना आणि पदाधिकाºयांना जाते. युवकांसाठी आणि विशेषत: क्रीडा क्षेत्राबाबतचे त्यांचे कार्य हे स्पृहणीय आहे,’’ असे प्रतिपादन राधाकृष्णन यांनी केले. नव्वदीच्या दशकात जेव्हा भारतीय उद्योजक लंडनला जायचे, तेव्हा वायएमसीएच्या हॉस्टेल्सला राहायचे, अशी आठवणही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितली. राज्यपालांनी आपल्या भाषणात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोप फ्रान्सिस यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.
जागतिक वायएमसीएच्या अध्यक्षा सोहेला हायेक यांनीही ‘बॉम्बे वायएमसीए’च्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. ‘‘दीडशे वर्ष हा फक्त एक आकडा मुळीच नव्हे, तर एक समृद्ध परंपरा आहे. जागतिक वायएमसीएच्या मोहिमेचा भाग म्हणून ‘बॉम्बे वायएमसीए’ने समाजासाठी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. १९७५मध्ये स्थापनेपासून या धकाधकीच्या शहरात आपली निरंतर ओळख संस्थेने जपली आहे. शिक्षण, निवारा, आरोग्य, क्रीडा, जीवनकौशल्य, आदी अनेक क्षेत्रांमधील कार्यामुळे ‘बॉम्बे वायएमसीए’ ही फक्त एक संस्था नसून, शहराची जीवनरेखा झाली आहे,’’ असे हायेक यावेळी म्हणाल्या. ‘‘जगात शांतता, विश्वास, समानता असे अनेक प्रश्न आहेत. परंतु जागतिक वायएमसीए या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सदैव बांधील असते,’’ असे हायेक यांनी पुढे सांगितले.
‘बॉम्बे वायएमसीए’ने स्थापनेपासून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने लोकांसाठी बरेच कार्य केले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षण, जीवन कौशल्य, आदी मोलाचे कार्य संस्थेने चालू ठेवले आहे, असे आशियाई-पॅसिफिक वायएमसीएचे सरचिटणीस नॅम बू वॉन यांनी प्रतिपादन केले. ‘बॉम्बे वायएमसीए’च्या दीडशे वर्षांच्या वाटचालीत संस्थेची सेवा आणि बांधिलकी यांचा सिंहाचा वाटा आहे. आजी-माजी पदाधिकाºयांच्या योगदानामुळे संस्थेला हे कार्य करता आले, अशा भावना राष्ट्रीय वायएमसीएचे अध्यक्ष व्हिन्सेंट जॉर्ज यांनी प्रकट केल्या. ‘बॉम्बे वायएमसीए’चे दीडशे वर्षांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ‘बॉम्बे वायएमसीए’चे माजी सरचिटणीस स्टॅनली करकेडा यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘बॉम्बे वायएमसीए’चे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी प्रास्ताविक केले. ‘‘प्रारंभीच्या काळात अनेकांच्या योगदानातून बॉम्बे वायएमसीएची पायाभरणी झाली. मग असंख्य उपक्रम पुरस्कत्र्यांच्या पाठबळामुळे यशस्वी करता आले. त्यामुळे मुंबईतच नव्हे, तर देशात ‘बॉम्बे वायएमसीए’चे नाव अधोरेखित झाले,’’ असे अध्यक्ष अमन्ना यांनी सांगितले. त्यानंतर ‘बॉम्बे वायएमसीए’च्या दीडशे वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा व्हिडीओ सादर करण्यात आला. संस्थेच्या १८७५पासूनच्या विविध उपक्रमांचा आढावा यानिमित्त घेतला गेला. याचप्रमाणे ‘बॉम्बे वायएमसीए’च्या दीडशे वर्षांच्या कार्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि स्मरणिककेचे प्रकाशनही यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला जागतिक वायएमसीए मोहिमेतील अनेक नामवंत, राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या व्यक्ती आणि शुभेच्छुक उपस्थित होते.
Comments