Sunday, January 12, 2025

वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली-सुभाष देसाई

By Manohar Kumbhejkar 

मुंबई-साहित्यसेवक वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली.मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता.प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता.मी त्यांची सावली म्हणून काम केले अश्या शब्दात शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक  सुभाष देसाई यांनी वसंत तावडे यांच्या कार्याचा गौरव केला.


प्रबोधन गोरेगाव व मार्मिक साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन- मार्मिक कथास्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून देसाई बोलत होते.यावेळी मंचकावर दैनिक नवशक्तिचे संपादक प्रकाश सावंत,साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर,प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे उपस्थित होते.डॉ.संजय उपाध्ये यांच्या मन करा रे प्रसन्न या सुमारे दोन तासांच्या सादरीकरणात त्यांनी आपले मन नेहमी कसे प्रसन्न ठेवायचे यावर भाष्य केले.या स्पर्धेसाठी प्रबोधन गोरेगावचे कार्यवाह गोविंद गावडे आणि सदस्य विजय नाडकर्णी यांनी सुरुवातीपासून सदर कथा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.


सुभाष देसाई पुढे म्हणाले की,वसंत तावडे हे स्वतः क्रिशाशील होते आणि दुसऱ्याला सुद्धा कामात गुंतवायचे.त्यांच्या अनेक साहित्यिक व लेखकांच्या ओळखी होत्या.त्यांच्या मुळे आम्हाला साहित्याची व वाचनाची आवड निर्माण झाली.दरवर्षी होणाऱ्या ठिकठिकाणच्या मराठी साहित्य संमेलननाला ते आम्हा प्रबोधन गोरेगावच्या सहकाऱ्यांना आवर्जून घेवून जात असत.


या कथा स्पर्धेला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.त्यामुळे आज वाचन आणि लेखनाचा संबंध तुटला तो या स्पर्धेने खोटा ठरला असे त्यांनी स्पष्ट केले.प्रबोधन गोरेगाव ही संस्था एखादे काम हाती घेते ते पुढे सुरूच राहते आणि साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती  कथा स्पर्धा पुढे सुरूच राहील अशी घोषणा सुभाष देसाई यांनी केली.


आजकाल समाजात भांडणे लावून नागरिकांना प्रबोधनकारांच्या विचारांपासून भरकटविण्याचे प्रयत्न होत आहेत. सत्तेसाठी सर्व काही चाललेले असताना प्रबोधनकारांचा माणुसकीचा व सर्वसमावेशक विचारच या महाराष्ट्राला आणि देशाला तारेल, असा विश्वास दैनिक नवशक्तीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सावंत यांनी  व्यक्त केला. प्रबोधनाचा सर्वसमावेशक विचार आपल्याला प्रगत व प्रगल्भ दृष्टी देतो. जात, धर्म, पंथ, प्रांतापलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देतो.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला जागे करून एकजुटीचा जो मार्मिक संदेश दिला ते महाराष्ट्रप्रबोधन असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रबोधन गोरेगाव संस्थेने इन्डोअर गेम्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल, धनुर्विद्या कक्ष, रक्तपेढी , जेनेरिक औषधांच्या दुकानांची साखळी उभी करून त्यातून माणुसकीचा धर्म जपला जात आहे. सुभाष देसाई यांनी उभारलेले हे रचनात्मक, संस्थात्मक, प्रबोधनात्मक सेवाकार्य चिरकाल टिकणारे असून हे सेवाकार्य साऱ्या देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील व त्यातूनच प्रबोधनकारी सकस विचारांची पिढी घडेल. देशाच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.


मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर म्हणाले की,

मार्मिक साप्ताहिक हा शिवसेनाप्रमुखांचा वारसा असून ज्ञानाचा खजिना आहे.या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.त्यातून चांगल्या व वेगवेगळ्या कथा मिळाल्या. त्यामुळे मराठी भाषा लयाला गेली नसल्याचे सिद्ध झाले. या सर्धेतून चांगल्या व वेगवेगळ्या कथा मिळाल्या. या स्पर्धेला मिळालेला चांगला प्रतिसाद बघता मराठी भाषा लयाला गेली नाही हे सिद्ध झाले.कथा लेखन, साहित्य मार्गदर्शन यासाठी प्रबोधन गोरेगावने पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली  2020 नंतर मार्मिकचे आतांरबाह्य बदलेले असून मार्मिक विविध रंगी आणि वाचनीय झाल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रास्ताविक विजय नाडकर्णी यांनी केले,तर सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.यावेळी गोरेगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 comments:

Anonymous said...

स्व.वसंतराव तावडे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा सोहळा अतिशय सुंदर झाला. त्याबद्दलचे वरील शब्दांकन देखील छानच!

Anonymous said...

स्व. वसंतराव तावडे यांच्या प्रबोधन गोरेगाव मधील निरपेक्ष निस्वार्थ सेवाकार्यास, शिवसेना व मा. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील दृढ विश्वासास आणि मराठी साहित्याबद्दल ध्यासास विनम्र भावांजली अर्पण करणा-या या सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावनांचे छान शब्दांकन.