मुंबई : 'प्रबोधन गोरेगाव' आणि 'साप्ताहिक मार्मिक' यांच्यातर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रसाद खानोलकर यांनी लिहिलेली ‘चंद्रफूल’ ही कथा ११ हजार रुपयांच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
अशोक गोवंडे लिखित ‘अ फ्रेंड इन नीड’ या कथेला पाच हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून तीन हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अमित पंडित लिखित ‘अंतर्धान’ या कथेने पटकावला आहे. मंगल कातकर लिखित ‘शोध’, सुरेशचंद्र वाघ लिखित ‘माझी रोबॉटिक मुलाखत’ आणि नवनाथ गायकर लिखित ‘नावात काय आहे’, या तीन कथांना अडीच हजार रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार लाभला आहे.
पारितोषिक विजेत्या कथांपैकी प्रथम क्रमांकाची कथा साप्ताहिक मार्मिकच्या दिवाळी अंकात प्रकाशित होणार असून अन्य पारितोषिक विजेत्या कथाही साप्ताहिक मार्मिकच्या नियमित अंकांत क्रमश: प्रकाशित होणार आहेत. संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते,कट्टर शिवसैनिक व साहित्यसेवक असलेल्या स्व. वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित झालेल्या या स्पर्धेला पहिल्याच वर्षी देशविदेशातील लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि शंभराहून अधिक कथा स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या.
नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा, पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे आणि मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रबोधनचे विजय नाडकर्णी यांनी कथांची प्राथमिक छाननी केली. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे व संस्थेचे गोविंद येतयेकर यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याच्या देखण्या कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व स्पर्धकांना दिली जाईल.
----------------------------------
No comments:
Post a Comment