Sunday, August 25, 2024

साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेचे आयोजन

मुंबई-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून सन १९७२ साली शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी प्रबोधन गोरेगाव या संस्थेची स्थापना केली. ज्ञान, कला, सेवा या त्रिसूत्रीला न्याय देत आज या संस्थेने गोरेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी प्रबोधन डायलेसिस सेंटर , मीनाताई ठाकरे रक्तपेढी , प्रबोधनकार ठाकरे वाचनालय सह अभ्यासिका , जॉगर्सपार्क , ओझोन स्विमिंग पूल , प्रबोधन क्रीडाभवन असे समाज उपयोगी उपक्रम चालू केले आहेत. संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त प्रबोधन संस्थेने ग्रामीण भागातील अर्धवट शिक्षण झालेल्या गरीब मुला मुलींना रोजगार मिळवण्यासाठी शिक्षणा सोबत तांत्रिक कौशल्य द्यावे याउद्देशाने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात एमजीएल- प्रबोधन कौशल्य निकेतन हि संस्था २०२२ पासून सुरु केली. या संस्थेत नर्सिंग , आयटी, इलेक्ट्रिक , एसी , गॅस पाईपिंग , ब्युटीपार्लर , टेलरिंग , मोबाईल रिपेअर सुरु केले असून दरवर्षी साधारण ३२० विध्यार्थी प्रशिक्षित होणार आहेत.


स्व. वसंत तावडे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन गोरेगाव या तीन नावानी झपाटलेला . या संस्थेचा ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासाची व कार्याची विविध वृत्तपात्रात /मासिकात छापून आलेली कात्रणे जमा करण्याचा त्यांना छंद होता. स्व. वसंत तावडे यांच्याकडे उत्तम वाचक आणि चांगला लेखक हे गुण असल्यामुळे त्यांनी *आपले वसंतश्री* हा दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम अनेक वर्षे सातत्याने व यशस्वीपणे चालविला. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने व्याकरणशुद्ध मराठी लेखनासाठी  त्यांचा प्रचंड आग्रह होता.


१९७७ साली मराठी साहित्य संमेलन गोरेगाव येथे भरवण्यासाठी स्व. वसंत तावडे यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई साहित्य संघ , गिरगाव या संस्थेशी आणि त्या संस्थेच्या कार्यात त्यांचा जवळचा संबंध होता तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जायचे त्या त्या ठिकाणी ते आपल्या मित्र पारिवाराला आग्रह करून सोबत घेउन जायचे.


   त्यांच्या असामान्य योगदानाला विनम्र अभिवादन म्हणून यावर्षी पासून '*साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा*' आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये मराठी कथा लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे  आवाहन प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक तर्फे केले  आहे.


या स्पर्धेसाठी किमान ३००० ते कमाल ४००० शब्द मर्यादा असावी. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम,द्वितीय, तृतीय,तसेच प्रथम उत्तेजनार्थ, द्वितीय उत्तेजनार्थ व सर्वोकृष्ट विनोदी कथालेखनास प्रोत्साहन म्हणून विनोदी कथा पारितोषिक दिले जाईल.लेखकांनी आपली कथा प्रबोधन गोरेगाव,प्रबोधन क्रीडाभवन,प्रबोधन क्रीडाभवन मार्ग,सिद्धार्थ नगर,गोरेगाव पश्चिम,मुंबई १०४ या पत्त्यावर किंवा prabodhankridabhavan2014@gmail.com या इमेल वर दि,३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावी असे आवाहन प्रबोधन गोरेगावने केले आहे.


No comments: