Tuesday, July 18, 2023

भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील उत्तम पद्धती समोर आणण्याचा, गुंतवणूक भागीदारीच्या संधी शोधण्याचा तसेच सर्वांच्या एकत्रित भविष्यासाठी नव्या आणि उज्ज्वल मार्गक्रमणासाठीचे व्यासपीठ ठरेल: सर्बानंद सोनोवाल

 


भारताच्या पायाभूत सुविधा विकासात, सागरमाला उपक्रमाचा मोठा वाटा असून यामुळे सागरी व्यापार आणि लॉजिस्टीक मध्ये धोरणात्मक प्रगती होऊन सागरी क्षेत्रात भारताची नेतृत्वस्थानाकडे वाटचाल : श्रीपाद नाईक

भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023, येत्या 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान, नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे होणार

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 च्या माहितीपुस्तिकेचे अनावरण, तसेच संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचेही उद्‌घाटन

Posted On: 18 JUL 2023 5:11PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जुलै 2023

भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील उत्तम पद्धती समोर आणण्याचा, गुंतवणूक भागीदारीच्या संधी शोधण्याचा तसेच सर्वांच्या एकत्रित भविष्यासाठी नव्या आणि उज्ज्वल मार्गक्रमणासाठीचे व्यासपीठ ठरेल, असे मत केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले. भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 च्या कर्टन रेझर अर्थात पुर्वपिठीकेचे आज मुंबईत  उद्घाटन करतांना ते बोलत होते. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा, भारतीय बंदर संघटना आणि मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा आणि फिककीचे सरचिटणीस शैलेश पाठक देखील उपस्थित होते.

जागतिक सागरी शिखर परिषद 2023 विषयी बोलतांना ते म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली गेल्या दशकभराच्या कार्यावर आधारित, आज तिसऱ्या जागतिक सागरी शिखर परिषद 2023 ची घोषणा करताना  मला अतिशय आनंद होत आहे. ही परिषद, सागरी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देणारे एक व्यासपीठ सिद्ध होईल, तसेच भारताच्या सागरी क्षेत्रातील संधी, सहकार्य, अभिनव कल्पना आणि या क्षेत्रातील क्षमतांना यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. या शिखर परिषदेत जागतिक सागरी क्षेत्रातील उद्योजक, धोरणकर्ते, नियामक, गुंतवणूकदार आणि उद्योगाच्या वाढीसाठी अविभाज्य घटक असलेले  इतर भागधारक एकत्रित येतील. विशिष्ट संकल्पनांवर आधारित सत्रे, विचारप्रवर्तक चर्चा, तांत्रिक क्षेत्रविशीक प्रदर्शने आणि संवादात्मक प्रदर्शनांद्वारे भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 देशांमधील अर्थपूर्ण भागीदारी वाढवेल तसेच सागरी उद्योगात नवोन्मेषाला संधी देईल. भारताला सागरी क्षेत्राचे शक्तिकेंद्र बनवण्याच्या दिशेने होत असलेल्या या प्रवासात आपण प्रगती, शाश्वत विकास आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करू. असे सोनोवाल म्हणाले.

भारताच्या सागरी क्षेत्राचा संदर्भ देत, सोनोवाल म्हणाले, भारताचे सागरी क्षेत्र हे आपल्या देशाच्या आर्थिक वाढीत  दीर्घकाळ पाठबळ देणारे आहे. वर्षानुवर्षे, आमच्या सरकारच्या, उद्योग हितधारकांच्या भक्कम प्रयत्नांमुळे आणि आमच्या सागरी समुदायाच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन घडले आहे. तांत्रिक प्रगतीचा अंगीकार करत, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत, कार्यक्षमता वाढवत आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून आम्ही प्रगती पथावर वाटचाल करत आहोत. आमचे कार्यक्रम आणि सुधारणा उपक्रम बंदराची क्षमता वाढवण्यासाठी, बंदर माध्यमातून औद्योगिकीकरण सुलभ करण्यासाठी, किनारपट्टीवरील वाहतूक वाढवण्यासाठी, आमच्या अंतर्देशीय जलमार्गांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापरात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

सागरी क्षेत्रातील भविष्यातील संधींबद्दल बोलताना मंत्री म्हणाले भारतीय सागरी क्षेत्रासाठी एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि आज आपण येथे त्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याची आकांक्षा बाळगतो. आमच्याकडे जागतिक सागरी केंद्र बनण्याची, आर्थिक वाढ घडवून आणण्याची, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख उद्योजक म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याची क्षमता आहे. आपल्यासमोरील संधी अफाट आणि वैविध्यपूर्ण आहेत. हे साध्य करण्‍यासाठी, आपण सहकार्य वाढवले पाहिजे, नवकल्पना स्वीकारली पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. आपण मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे, कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे आणि उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे अनुकूल वातावरण निर्माण करणे सुरू ठेवले पाहिजे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय बंदर वाहतूक आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, "भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये अत्यधिक परिवर्तन होत आहे आणि अभूतपूर्व संधी उपलब्ध होत आहेत. विकासाच्या या प्रवासात परिवर्तनशील सागरमाला उपक्रम भारताच्या पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये आघाडीवर आहे, व्यापार आणि लॉजिस्टिक्समध्ये धोरणात्मकदृष्ट्या प्रगती करत आहे आणि आपल्या देशाला सागरी नेतृत्व करणारा म्हणून स्थान मिळवून देत आहे. पायाभूत सुविधांचा विकास, लॉजिस्टिक स्पर्धात्मकता सुधारणे, औद्योगिकीकरणाला चालना देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि किनारी अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट होते. आपल्या बहुआयामी दृष्टिकोनातून, सागरमाला प्रकल्पाने बंदर आधुनिकीकरण, सुधारित बंदर कनेक्टिव्हिटी आणि बंदरांच्या माध्यमातून औद्योगिक क्लस्टर्सच्या विकासाला चालना दिली आहे.

या धोरणात्मक सहयोगाने भारताला गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा एक प्राधान्यक्रमाचा जागतिक व्यापार भागीदार म्हणून स्थान दिले आहे. सागरमाला कार्यक्रमाचे यश हे त्याच्या यशस्विता आणि आपल्या देशाच्या सागरी क्षेत्रावर प्रभाव असण्याचा पुरावा आहे.

पूर्वपिठीका कार्यक्रमात (कर्टन रेझर)  भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 साठी अधिकृत माहितीपुस्तिकेचे अनावरण तसेच संकेतस्थळ आणि मोबाइल पचा प्रारंभ करण्यात आला.

इंडियन नॅशनल शिपओनर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल देवली, फोस्मा मेरीटाईम इन्स्टिट्यूट आणि रिसर्च ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश टंडन,  फिक्कीच्या  बंदरे आणि नौवहन, परिवहन पायाभूत सुविधांवरील समितीचे अध्यक्ष आणि जेएम बक्सी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कोटक यांनी यावेळी  या क्षेत्रातील भागधारक म्हणून आपल्या भूमिका मांडल्या .

भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद (जीएमआयएस) 2023 विषयी :

भारताच्या सागरी क्षेत्रात संधी शोधणे, आव्हाने समजून घेणे आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी या उद्योगातील महत्त्वाच्या व्यक्तींना एकत्र आणण्याकरता जीएमआयएस 2023 हा एक प्रमुख सागरी क्षेत्र केंद्रित कार्यक्रम आहे. आधीच्या यशस्वी कामगिरीवर पाऊल टाकत, या तिसऱ्या टप्प्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सागरी  भागधारक तसेच गुंतवणूकदारांसाठी व्यापक संधी प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. जागतिक स्तरावर आपले अस्तित्व ठसवणे आणि भारताच्या सागरी उद्योगावर प्रकाश टाकण्यासाठी सज्ज, सागरी क्षेत्रविषयक शिखर परिषद आता या वर्षीच्या सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषदेत विकसित झाली आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 17 ते 19 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ही शिखर परिषद होणार आहे. फिक्की ही संघटना याची विशेष उद्योग भागीदार आहे.

संपूर्ण ध्येयधोरणे आणि नोंदणी तपशीलांसह सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद  2023 च्या अधिक तपशीलांसाठी, कृपया www.maritimeindiasummit.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.  

Jaydevi PS/Radhika/Vasanti/Vinayak/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1940512) Visitor Counter : 23


Read this release in: English

    No comments: