Tuesday, June 16, 2020

कोविडमुळे जीव गमावलेल्या शहीद पोलीसांच्या कुटुंबांसाठी मॅनकाइंड फार्मास्युटिकलकडून ५ कोटी रुपयांची मदत

  • मरण पावलेल्या प्रत्येक कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाला ३ लाख रुपयांची केली मदत
१६ जून २०२०: कोविड -१९ च्या सुरू असलेल्या महामारीमध्ये देशातील पोलीस दल सर्वांत आघाडीवर राहून या संकटाचा सामना करत आहे. या काळात संपूर्ण समर्पण भावाने काम करणाऱ्या अनेक पोलिसांना त्यांचे प्राण गमवावे लागले.
समाजातील एक जबाबदार घटक म्हणून मॅनकाइंड फार्मा कंपनी या नायकांच्या कुटुंबियांच्या सोबत उभी आहे, आणि त्यांना मदत करण्यासाठी ५ कोटी रुपयांची देणगी कंपनीने दिली आहे. कोरोनादरम्यान जीव गमावलेल्या प्रत्येक योद्ध्याच्या कुटुंबाला कंपनीच्या वतीने ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
या महामारीविरुद्धच्या देशाच्या लढ्यामध्ये विविध पद्धतींनी मॅनकाइंड फार्माचा सहभाग आहे. कंपनीने परवडतील अशा औषधांची निर्मिती केली असून, विविध राज्यांना ही औषधे, व्हेंटिलेटर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स (पीपीई) दान केली आहेत. कोरोना विषाणू संसर्गादरम्यान संसर्गजन्य भागात पूर्ण समर्पितपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरांतून आदर व्यक्त केला जात आहे. भारताचे नागरिक आणि देशातील एक महत्त्वाचा घटक म्हणून मॅनकाइंड फार्माला या धाडसीपणाने, नि:स्वार्थपणे समर्पित काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक वाटते.
महसूल आणि सीएसआर कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे या दोन्ही आघाड्यांवर सर्वोच्च फार्मास्युटिकल ब्रँड अशी मॅनकाइंड फार्मा कंपनीची ओळख आहे. या महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशात कंपनीने मुख्यमंत्री मदत निधीला ५१ कोटी रुपयांची मदत केली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांचा एक दिवसाचा पगार देऊन हातभार लावला.
महामारीच्या काळात आपापल्या पद्धतीने समाजाची मदत केल्याबद्दल मॅनकाइंड फार्मा कंपनीने नुकतेच ओडिशातील रामा साहू, बिहारची ज्योती कुमारी, मदुराईचे सी. मोहन, पुण्यातले अक्षय कोठवा आणि सुरतजवळच्या वांकला या गावातील देवगानिया कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत केली होती.
मॅनकाइंड फार्माचे सीईओ राजीव जुनेजा म्हणाले, ‘'या अभूतपूर्व महामारीच्या संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लढत राहणाऱ्या आपल्या पोलिस योद्ध्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. कोविडच्या कठीण काळात सामान्य नागरिकाच्या रक्षणार्थ पहिली फळी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नंतर पोलिसांनी दुसऱ्या फळीत आपले रक्षण केले त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष या आजाराचा सामना करावा लागला. महामारीविरुद्ध लढताना आणि आपले प्राण वाचवताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. देशासाठी आणि मानवतेसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या दिलेले बलिदान विस्मृतीत जाणार नाही.
या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांना छोटीशी मदत म्हणून ५ कोटी रुपयांचा निधी देत आहोत. आम्ही दिलेल्या लहानशा मदतीमुळे या पोलिस योद्ध्यांच्या कुटुंबियांना थोडा आधार मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.’'  

No comments: