Wednesday, May 20, 2020

महाराष्ट्र कामगार ब्युरोचे कामगार संघटनांकडून स्वागत , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

दि. २०

भांडवली व पायाभूत सुविधांबरोबरच कामगार हा घटक उद्योग विश्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भूमिपुत्रांना संधी देताना उद्योग विश्वाला कुशल-अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कामगारवर्गाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही संकल्पना साकारली जात आहे. आज कामगार संघटनांकडून याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. 

  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगार ब्यूरोसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार भाई जगताप, विनोद घोसाळकर, जयप्रकाश छाजेड, शिवाजीराव गटकळ, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

 सुभाष देसाई म्हणाले की, कोरोनाचा अर्थचक्रावर होणार परिणाम किती काळ राहील हे सांगता येत नाही. परंतु महाराष्ट्र शासानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून सत्तर हजार उद्योगांना परवाने दिले आहेत. त्यात १२ लाख कामगार रुजू झाले आहेत. परंतु स्थलांतरित मजूर गावी गेले आहेत. त्यामुळे उद्योगांत कामागारांची टंचाई निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी औद्योगिक कामगार ब्यूरो ही संकल्पना पुढे आली आहे. आपल्याकडे कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्योजकांनी स्थानिकांना रोजगारांची संधी द्यावी. मराठी तरुणांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले. कामगार नेत्यांच्या सर्व सूचनांचा विचार करून प्रारूप आराखडा तयार करणार असल्याचे यावेळी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

No comments: