मुंबई- वर्सोवा येथील लोखंडवाला मार्केट हे आधीपासूनच एक प्रसिद्ध लँडमार्क आहे आणि आता या परिसराची शोभा आणखी वाढणार आहे कारण अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोखंडवाला येथील 'श्री स्वामी समर्थ मठा'जवळ असलेल्या सर्कलमध्ये आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केलेले कारंजे उभारण्यात आले आहे. या सर्कलच्या सुशोभीकरणामुळे येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वर्सोवा विधानसभेच्या भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या संकल्पनेतून आणि डीपीडीसी फंडातून श्री स्वामी समर्थ सर्कल, लोखंडवाला परिसराचं सुशोभिकरण करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सर्कलचा उद्घाटन सोहळा सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार डॉ. भारती लव्हेकर, माजी नगरसेवक योगीराज डाभाडकर (वॉर्ड ६०) आणि माजी नगरसेविका रंजना पाटील (वॉर्ड ६३) उपस्थित होते.
आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, "लोखंडवाला मार्केट आधीच एक लक्षवेधक लँडमार्क आहे, परंतु त्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कामे हाती घेण्यात आली. या सर्कलच्या सुशोभिकरणामुळे परिसर आणखी सुंदर आणि आकर्षक झाला आहे.
अभिनेते सोनू सूद यांनी डॉ. भारती लव्हेकर यांच्या विकास कार्याचे कौतुक करताना म्हणाले की, मी याच मतदार संघात राहतो, आणि गेल्या १० वर्षात त्यांनी अनेक विकास कामे केल्याने या मतदार संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्या नेहमीच उत्तम काम करतात आणि कामासाठी सहजतेने उपलब्ध असतात व त्यांचा वेळ देतात. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्याशी एका रस्त्याच्या कामाविषयी बोललो होतो आणि अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी ते पूर्णत्वास नेले याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्यासारख्या कार्यक्षम आणि समर्पित व्यक्तिमत्वामुळे समाजात सकारात्मक बदल घडतो.
No comments:
Post a Comment